mr_obs/content/39.md

8.4 KiB
Raw Permalink Blame History

‌‌‌येशूची चौकशी

OBS Image

‌‌‌हा मध्यरात्रीचा समय होता.‌‌‌सैनिकांनी येशूची चौकशी करण्यासाठी त्याला महायाजकाच्या घरी घेऊन गेले.‌‌‌पेत्र लांबूनच त्यांच्या पाठीमागे येत होता.‌‌‌ते जेंव्हा येशूला आत घरामध्ये घेऊन गेले, तेंव्हा पेत्र बाहेर थंडी असल्यामुळे शेकत बसला होता.

OBS Image

‌‌‌आत घरामध्ये, यहूदी धर्मपुढारी येशूची चौकशी करीत होते.‌‌‌त्यांनी येशूविरुद्ध अनेक खोटे साक्षीदार आणले होते.‌‌‌तथापि, त्यांच्या जबानीमध्ये मेळ नव्हता म्हणुन यहूदी पुढा-यांना येशूचा गुन्हा सिद्ध करता आला नाही.‌‌‌या समयी येशू काहीच बोलला नाही.

OBS Image

‌‌‌शेवटी, महायाजकाने येशूकडे पाहून विचारले, ‘‘आम्हास सांग, की तू मशीहा, जिवंत देवाचा पुत्र आहेस?

OBS Image

‌‌‌येशू म्हणाला, मी आहे, आणि तुम्ही मला पित्याच्या बाजूस बसलेला व स्वर्गातून येत असतांना पाहाल.’’‌‌‌तेंव्हा महायाजकाने रागाने आपली वस्त्रे फाडिली व अन्य धार्मीक पुढा-यांसमोर मोठयाने म्हणाला, ‘‘आता आम्हास आणखी पुराव्याची गरज नाही!‌‌‌तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हटले हे तुम्ही स्वत: ऐकले आहे.‌‌‌तुमचा निवाडा काय आहे?

OBS Image

‌‌‌सर्व यहूदी पुढा-यांनी महायाजकास उत्तर दिले, ‘‘तो मरणदंडास पात्र आहे!’’‌‌‌मग त्यांनी येशूच्या डोळयांवर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्यास मारिले व त्याची थट्टा उडविली.

OBS Image

‌‌‌पेत्र घराबाहेर वाट पहात होता, तेंव्हा घरकाम करणा-या एका मुलीने त्यास म्हटले, ‘‘तूही येशूबरोबर होतास!’’‌‌‌पेत्राने नकार दिला.‌‌‌नंतर, दुस-या एका मुलीने असेच म्हटले, आणि पेत्राने पुन्हा एकदा नकार दिला.‌‌‌शेवटी, लोक म्हणाले, ‘‘आम्हास ठाऊक आहे की तू येशूबरोबर होतास कारण तुम्ही दोघेही गालील प्रदेशातील आहात.

OBS Image

‌‌‌तेंव्हा पेत्राने शपथ घेऊन म्हटले, ‘जर मी हया मनुष्यास ओळखत असेल तर देव मला शापित करो!’’‌‌‌लगेच, कोबडा आरवला, आणि येशूने मागे वळून पेत्राकडे पाहिले.

OBS Image

‌‌‌तेंव्हा पेत्र दूर जाऊन खूप रडला.‌‌‌दरम्यान, येशूस धरुन देणा-या यहूदाने पाहिले की, यहूदी धर्मपुढा-यांनी येशूला मरणदंडाची शिक्षा दिली आहे.‌‌‌तेंव्हा यहूदास असे केल्याचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.

OBS Image

‌‌‌दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले.‌‌‌त्यांना आशा होती की पिलात येशूस दोषी ठरवून मरणदंडाची शिक्षा देईल.‌‌‌पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?

OBS Image

‌‌‌येशूने उत्तर दिले, ‘‘तू असे म्हणतोस परंतू माझे राज्य हया पृथ्वीचे नाही.‌‌‌असे असते तर, माझे सेवक माझ्यासाठी लढले असते.‌‌‌मी या पृथ्वीवर देवाविषयीचे सत्य सांगण्यास आलो आहे.‌‌‌सत्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण माझे ऐकतो’’ ‌‌‌पिलाताने विचारले, ‘‘सत्य काय आहे?

OBS Image

‌‌‌येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही.’’‌‌‌परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’‌‌यावर ‌पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे!’’‌‌‌पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले.‌‌‌तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.

OBS Image

‌‌‌जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी पिलातास भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली.‌‌‌रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला.‌‌‌मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!

बायबल कथा :‌‌‌मत्तय 26: 57-27:26; मार्क 14 : 53 - 15: 15; लूक 22: 54 - 23 : 25; योहान 18 : 12 - 19:16